Sambhaji Nagar Accident: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; तीन भावंडांचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

छत्रपती संभाजी नगरमधल्या (Chhatrapati Sambhaji Nagar) बाळापूर फाट्यावर भीषण अपघात (Accident) झाला असून परीक्षेसाठी जाणाऱ्या तीन बहीण-भावाचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे परीक्षेसाठीचे हॉलतिकीट सापडले आहेत. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावं आहेत. ते तिघेही सख्खे बहीण-भाऊ असून 20 ते 25च्या दरम्यान त्यांची वयं होती. ते मागील काही दिवसांपासून सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते. छत्रपती संभाजी नगरमधल्या बाळापूर फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.  (हेही वाचा - Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video))

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. मृतांच्या दुचाकीला हायवा गाडीने चिरडलं. त्यातच ते तिघे सख्खे बहीण-भाऊ मृत पावले. घटनेनंतर हायवाचालक पसार झाला आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत.