राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आलं आहे. "जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोलकर, पानसरे करु..." अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. नाशिकमधील भुजबळ फार्म वर हे निनावी पत्र पाठवण्यात आलं असून यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नाशिकमधील पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबद्दल तक्रार दाकल केली आहे.
काही दिवसांपूर्वी भुजबळ नागपूरात म्हणाले होते की, "आम्हाला मनुस्मृती नको, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय." तसेच त्यांनी मनुस्मृतीला विरोध दर्शवला होता. यावरुनच हे धमकीचे पत्र भुजबळांना पाठवण्यात आले असण्याची शक्यता आहे. मात्र धमकीचं पत्र मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्मकडे धाव घेतली आणि या पत्राची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.