राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील आठ जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. या आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी कोणत्या चेहऱ्यांना मिळते याबाबत उत्सुकता होती. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचीही किनार होती. अमरावती (Amravati) , पालघर (Palghar),भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondiya), हिंगोली , वर्धा , बुलडाणा , गडचिरोली जिल्ह्यांसाठी पालकमंत्री निवड करण्यात येणार होती. त्यासाठी अनेक चेहऱ्यांची नावे चर्चेत होती.
पाहा कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे?
अमरावती – डॉ. अनिल बोंडे
पालघर – रवींद्र चव्हाण
भंडारा – डॉ. परिणय फुके
गोंदिया – डॉ. परिणय फुके
हिंगोली – अतुल सावे
वर्धा – चंद्रशेखर बावनकुळे
बुलडाणा – संजय कुटे
गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपतील एका गटाकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांची औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून निवडण्यात यावे अशी या गटाची इच्छा होती. मात्र, सावे यांना औरंगाबादचे पालकमंत्री न करता त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (हेही वाचा, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झाले खातेवाटप; जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते)
औरंगाबादचे पालकमंत्रीपद सध्या शिवसेनेकडे आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्यापूर्वी ती तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे होती. मात्र, दीपक सावंत हे विधान परिषदेवर होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली.