Dr. Ramchandra Danekar | Photo Credits: ANi)

कोविड-19 (Covid-19) च्या संकटात सर्वत्र नकारात्मक वातावरण पाहायला मिळत असताना काही मदत करणाऱ्या हातांनी सकारात्मक ऊर्जा दिली. अशीच एक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून समोर येत आहे. कोरोना संकटात गावकऱ्यांवर उपचार करण्यासाठी 87 वर्षांचे होमिओपॅथिक डॉक्टर (Homoeopathic Doctor) यांनी धाडसी निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या सेवेसाठी ते दररोज तब्बल 10 किमी चा प्रवास सायकलवरुन करतात. अनवाणी सायकल चालवत ते घरोघरी जावून रुग्णांवर उपचार करत आहेत. गेल्या 60 वर्षांपासून त्यांचे हे कार्य अखंड सुरु आहे. रामचंद्र दाणेकर (Ramchandra Danekar) असे या होमिओपॅथिक डॉक्टरांचे नाव आहे.

"मी दररोज गावकऱ्यांच्या सेवासाठी गावात जातो. कोविड-19 संकटात गरिबांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर घाबरत होते. पण मला ते भय नाही. सध्याच्या काळात तरुण डॉक्टरांना केवळ पैसा कमवायचा आहे. त्यांना गरिबांची सेवा करण्यात रस नाही", असे डॉ. रामचंद्र दाणेकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

ANI Tweet:

डॉ. रामचंद्र दाणेकर यांचे उदाहरण अत्यंत सकारात्मक आहे आणि या वयातील त्यांची ऊर्जा तरुणाईला लाजवेल अशी. त्यांच्या सेवाभावी वृत्तीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्या कार्याला, सेवेला आणि ऊर्जेला सलाम.

दरम्यान, कोविड-19 संकट कायम असून राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1617658 वर पोहचला आहे. त्यापैकी 1415679 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 158852 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना संसर्गामुळे 42633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.