Chandrapur: 8 शेतकरी व जवळजवळ 25 गुरांचा बळी घेतलेल्या RT-1 नावाच्या वाघाला पकडण्यात यश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) येथील चांदा वनविभागाचा भाग असलेल्या राजुरा तहसीलमध्ये एका नरभक्षक वाघाने दहशत माजवली होती. या वाघाचे नाव RT-1 असे असून, त्याने तब्बल 8 लोकांचा बळी घेतला आहे. आज दुपारी वन विभागाच्या पथकाने या वाघाला जिवंत पकडले. याआधी कॉंग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर (Congress MP Suresh Dhanorkar) यांनी प्रदेशातील वन अधिकाऱ्यांना एका नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून एक विशेष पथक या वाघाला जेरेबंद करण्याचा प्रयत्न करीत होते.

याआधी वाघाला पकडण्यासाठी खास पथकाची स्थापना केली होती, 100 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले होते, 30 मचाण, 4 शूटर्स, अनेक वन कर्मचारी मिळूनही या वाघाला पकडू शकले नव्हते. आता या वाघाला जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 25 वनरक्षकांची चार पथके (STPF), 14 गावांतील 35 स्वयंसेवक यांच्यासह 4 पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते. (हेही वाचा: मुंबई: MSRTC सांगली विभागातील 105 कर्मचारी BEST Buses ला सेवा देऊन गावी परतल्यानंतर आढळले कोरोना पॉझिटिव्ह)

रात्रीच्या अंधारातच हा वाघाचा अधिक वावर होता. या वाघाच्या दहशतीने अनेक शेतकरी, कामगार कामावर जाण्यास टाळत होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ सापळ्यात अडकता-अडकता पिंजरा तोडून पळाला होता. त्यानंतर मागावर असलेल्या पथकांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. यात चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशूवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या वाघास जिवंत जेरबंद करण्यात आल्याने हे वन विभागाचे मोठे यश मानले जात आहे. वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.