Chandrapur Tadoba Jungle: ताडोबा जंगलाची शान असलेला 'छोटा मटका' हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. त्याच्या निडर, हेकेखोर स्वभावामुळे तो प्रसिद्ध आहे. त्याच्या झुंजीचे, शिकारीचे, तर कधी पाण्याचा आनंद घेत असतानाचे त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अशातच त्याचा पर्यटकांमधला एक व्हिडीओ समोर आला आहे. डेक्कन ड्रिफ्ट्सची टीम ताडोबात जंगल सफारी करत असताना अचानक 'छोटा मटका' त्यांच्या वाहनाच्या जवळ आला. तो त्यांच्या सर्व वाहनांच्या आजूबाजूला फिरला. तेव्हा तेथे असलेल्या सर्व पर्यटकांनी त्याचे फोटो काढले काहींनी व्हिडीओ काढले.
ताडोबाच्या वन्यजीवांची शान म्हणून ओळखला जाणारा 'छोटा मटका' हा वाघ अनेक वर्षांपासून ताडोबाच्या जंगलात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 3 ते 4 महिन्यांपूर्वी एका झुंजीत तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पाहणे कठीण झाले होते. मात्र आता अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो बरा झाला आहे. जंगलात फेरफटका मारताना तो दिसत आहे.
ताडोबा जंगल वर आपल्या अधिपत्या ला सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने होणाऱ्या टेरेटरी फाईट मध्ये जखमी झालेला ताडोबाचा राजा छोटा मटका ३/४ महिन्यांननंतर पूर्णपणे तंदुरुस्त होउन आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी टेरेटरी मार्किंग करताना जंगलं भ्रमंती दरम्यान पर्यटकाना दीले दर्शन. pic.twitter.com/IKZGZVdbay
— Piyush Dilip Akare (@PiyushAkare5566) May 29, 2024
डेक्कन ड्रिफ्ट्सचे प्रमुख आणि वन्यजीव संशोधक पियुष आक्रे यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला. ''छोटा मटका' जंगलात आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी 'टेरिटरी मार्किंग' करत आहे. त्यामुळे पर्यटक त्याला जवळून पाहू शकत आहेत. 'छोटा मटका' संपूर्ण ताडोबाच्या जंगलातील सर्वात मोठा वाघ आहे. यासोबतच भानुसाखिंडी, झरणी, बबली या त्याच्या तिन्ही राण्या असून सर्व माद्यांना 3 बछडे आहेत. तो आज ताडोबातील नवेगाव परिसरात दिसून आला,' असे ते पोस्टमध्ये म्हणाले.