Megablock (Photo Credits:Twitter)

'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था झालेल्या मध्य रेल्वेने (Central Railway) आजही चाकरमान्यांचा आठवड्याचा पहिला दिवस त्रासदायक बनवला. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कर्जत (Karjat) जवळील रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबई (Mumbai) आणि ठाण्याच्या (Thane) दिशेने येणा-या लोकल 20-25 मिनिटे उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी ही समस्या निर्माण झाल्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागला. दुरुस्तीचे काम सुरु असून अजूनही या मार्गावरील अनेक रेल्वे उशिराने धावत आहेत.

कर्जत-भिवपुरी (Karjat-Bhivpuri) रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास रुळाला तडा गेला. त्यामुळं मुंबई आणि ठाण्याकडे येणाऱ्या लोकलगाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

हेदेखील वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

सकाळच्या वेळेस कर्जत, भिवपुरीहून नोकरीसाठी मुंबईला येणा-या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. अशा वेळी गर्दीच्या वेळी हा गोंधळ झाल्याने त्रेधातिरपीठ झाली. तसेच मुंबई आणि ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या मार्गावर रेल्वे पूर्ववर सुरु होण्यास थोडा वेळ लागणार असून प्रवाशांनी सहकार्य करावे अशी आवाहन मध्य रेल्वे ने केले आहे. रविवारच्या मेगाब्लॉक पाठोपाठ आजचा सोमवार देखील त्रासदायक झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. इतके मेगाब्लॉक ठेवत असूनही रेल्वेचे प्रश्न मार्गी का लागत नाही असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.