Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

Mumbai Mega Block Update: मध्य रेल्वेने रविवार, 18 मे रोजी उपनगरीय सेवांमध्ये मोठा ब्लॉक (Mumbai Mega Block) जाहीर केला आहे, ज्यामुळे आवश्यक देखभालीची कामे सुलभ होतील. यासंदर्भात सूचना अधिकृत डीआरएम मध्य रेल्वे एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर करण्यात आली आहे. घोषणेनुसार, ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या रेल्वे सेवा सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत प्रभावित होतील, तर वडाळा-मानखुर्द मार्गावर सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 पर्यंत वेगळा ब्लॉक असेल. या मार्गांवर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि देखभालीची कामे करण्यासाठी हे ब्लॉक घेण्यात येत आहेत.

कल्याण ते ठाणे अप आणि डाउन फास्ट मार्गांवर तसेच वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गांवर देखभालीच्या कामासाठी ब्लॉक चालवला जाईल. प्रवाशांना विनंती आहे की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी कृपया त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असं आवाहनही या सूचनेमध्ये मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. (हेही वाचा - BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही)

पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक -

दरम्यान, पश्चिम रेल्वेने मंगळवार आणि बुधवार, म्हणजेच 20 ते 21 मे 2025 च्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर दरम्यान महत्त्वाच्या देखभालीसाठी 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. हा ब्लॉक मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:00 वाजेपर्यंत असेल, ज्यामध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गांचा समावेश असेल.

अप आणि डाऊन मार्गांवरील काही लोकल सेवा रद्द -

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या काळात विरार/वसई रोड आणि बोरिवली/भाईंदर दरम्यान जलद मार्गांवर धीम्या मार्गावरील गाड्या धावतील. याव्यतिरिक्त, अप आणि डाऊन मार्गांवरील काही लोकल सेवा रद्द केल्या जातील. प्रवाशांना रेल्वे हालचालींबद्दल सविस्तर माहितीसाठी संबंधित स्टेशन मास्टर्सशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापि, रविवार, 18 मे रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉकचे नियोजन नाही.