Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) हे जसे चित्रविचित्र वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच ते शीघ्र काव्यासाठीही प्रख्यात आहेत. गल्ली ते अगदी दिल्लीतील संसदेतही आपल्या भाषणांदरम्यान आठवले चारोळ्या व शीघ्रकविता सादर करतात. त्यांनी आतापर्यंत विविध मुद्द्यावर कविता केली आहे. त्यातून ते हास्याचे फवारे सोडतात. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आता चक्क कोरोनावरच कविता केली आहे. नुकतीच त्यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली आहे. दरम्यान, त्यांनी लिहलेल्या कवितेच्या ओळी बोलून दाखवल्या आहेत. त्यांची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

कोरोनावर भाष्य करत असताना रामदास आठवले यांनी स्वत: लिहलेल्या कविताच्या ओळी म्हणून दाखवल्या आहेत. दरम्यान, ते म्हणाले की, "मी 20 फेब्रुवारीला ‘गो कोरोना’चा नारा दिला. कोरोना वाढतोय, त्यावर मी कविता केलीय. पण कोरोनाने मलाही सोडले नाही. मलाही कोरोना झाला. त्यामुळे मी नवी कविता करतोय, ‘गो कोरोना गो, कोरोना गो.. नो कोरोना नो कोरोना नो.., कोरोना को मत डरोना, गर्दी टाळा, नियम पाळा आणि कोरोना जाळा’, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. त्यांची कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. तसेच त्यांच्या या कवितेवर भन्नाट अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हे देखील वाचा- Ramdas Athawale Meets Madan Sharma: रामदास आठवले यांनी घेतली शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांंची भेट, दिली ही प्रतिक्रिया

रामदास आठवले यांना गेल्या 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. ज्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रामदास आठवले कोरोनामुक्त झाल्याचे कळताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराजवळ शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.