आता केवळ 15 मिनिटांत पोहोचा एलिफंटा लेण्यांपर्यंत; नव्या 'रोपवे'चा प्रस्ताव मंजूर
एलिफंटा लेणी (Photo Credit : Events High)

होय, आता मुंबईवरून एलिफंटा लेण्यांपर्यंत तुम्ही फक्त 15 मिनिटांत पोहचू शकणार आहात. मात्र ही गोष्ट घडणार आहे 2022 मध्ये. मुंबईमधील सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेले, एलिफंटा लेणी मुंबईपासून साधारण 10 किमी अंतरावर एका बेटावर वसलेली आहेत. सध्या तिथे पोहचण्यासाठी साधारण दीड तास इतका कालावधी लागतो, मात्र येत्या काही वर्षांत तुम्ही फक्त 15 मिनिटांत या बेटावर पोहोचाल.

सध्या मुंबईवरून एलिफंटा लेणी इथे पोहचण्यासाठी एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे फेरी बोट. गेट वे ऑफ इंडिया पासून या बोटीने लेण्यांजवळ पोहचण्यास साधारण दीड तास लागतो. तसेच या बोटीचे दरही थोडे जास्त आहेत. याचसोबत उन्हाळ्यात या बोटीने प्रवास करताना बसणाऱ्या उन्हाच्या झळांमुळे अनेक पर्यटक उन्हाळ्यात एलिफंटाला भेट देणे टाळतात. या सर्वांचा विचार करून, अशा पर्यटन स्थळाजवळ पोहचण्यास एक पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असावेत, म्हणून करून केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट अरबी समुद्रात मुंबई ते एलिफंटा लेणी अशा 8 किमी रोपवेची निर्मिती करणार आहे. यासाठी सध्या सरकार 30 केबल कार्स उभारण्याचा विचार करत आहे.

जर हा रोपवे वेळेत तयार झाला, तर हा भारतातील समुद्रात असणारा पहिला रोपवे ठरणार आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला असून, लवकरच याचे काम सुरु होईल. ‘घारापुरी किंवा एलिफंटा लेणी असलेल्या या बेटाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केले आहे. भारतातली सर्वाधिक प्राचीन लेणी असलेल्या या बेटाला दरवर्षी लाखों देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे आता या रोपवे मुळे या पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.