कळंबोली (Kalamboli) मधील एका शाळेजवळ सापडलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, या फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती सिमेंटच्या बॉक्स मधून स्फोटक ठेवताना दिसून आली आहेत. लोकमतच्या वृत्तानुसार,या बॉम्बसदृष्य वस्तूचा सोमवारी मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान नवी मुंबई पोलिस (Navi Mumbai Police) गुन्हे शाखा व मुंबई एटीएस (Mumbai ATS) च्या पथकाने या फुटेज वरून आरोपीचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.
कळंबोली सेक्टर 1 येथील सुधागड एज्युकेशन शाळेबाहेरील रस्त्यावर सोमवारी दुपारी बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यात आली होती. याची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना एका सिमेंट खोक्यामध्ये ठेवलेल्या घड्याळाला तारा जोडून त्या तारा एका दुसऱ्या बॉक्सला लावून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. यासोबतच बाजूलाच एका छोट्या बॉक्समध्ये खिळे व काही धारदार धातू ठेवण्यात आलेले होते. यावरून पोलिसांना नेमकं त्या बॉक्स मध्ये काय आहे याचा णदसज येत नव्हता त्यामुळे सोमवारी मध्यरात्री रोडपाली मार्गावर सिमेंट बॉक्सला स्फोटके जोडून स्फोट करण्यात आला. यांनतर बॉक्सचे उर्वरित तुकडे तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले. या बॉक्स मध्ये स्फोटके ठेवली असल्यास याचा खुलासा लांबचा अहवाल आल्यावरच होईल.
पहा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले फुटेज
दरम्यान पोलिसांच्या तपासात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टोपी घातलेल्या व्यक्तीने एक हातगाडी घटनास्थळी ठेवल्याचे समोर आले. फुटेजमध्ये संबंधीत आरोपीने डोक्यावर टोपी घातली आहे. स्वत:चा चेहरा कॅमेऱ्यामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पोलिसांनी सदर व्यक्ती ज्या मार्गाने गेली तेथील सर्व कॅमेऱ्यांची सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली आहे या तपासातून लवकरच आरोपी हाती लागेल अशी माहिती देण्यात आली आहे.