Praful Patel Cbi Clean Chit | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2024: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थातच सीबीआयने (CBI) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel Clean Chit) यांना मोठा दिलासादिला आहे. प्रफुल्ल पटेल यांचा समावेश असल्याचा आरोप असलेल्या भ्रष्टाचाराच्या कथीत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाची केस पूर्ण बंद झाली आहे. एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमितता झाल्या आरोप होता. याच प्रकरणात पटेल यांचे नाव आले होते. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीत पटेल यांना क्लिन चिट मिळाल्याने राजकीयदृष्टाय ही अतिशय मोठी घडामोड मानली जात आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास सात वर्षांच्या सखोल चौकशीनंतर सीबीआयने हे प्रकरण अधिकृतपणे बंद केले आहे. तपास यंत्रणेने प्रफुल्ल पटेल आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाच्या माजी अधिकाऱ्यांनाही क्लीन चिट दिली आहे. सीबीआयने मार्च 2024 मध्ये सक्षम न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल केला. विशेष म्हणजे, सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठी घडामोड ठरतो. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते मानले जातात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले. हे बंड पाठिमागच्या वर्षी (2023) जुलै महिन्यात झाले. तेव्हा जे नेते अजित पवार यांच्यासोबत होते त्यामध्ये पटेल यांचा क्रमांक सर्वात वरचा होता. या गटाने पुढे राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना-एकनाथ शिंदे कॅम्प सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी केली होती. (हेही वाचा, Sharad Pawar on Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवर शरद पवार यांचे भाष्य; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत व्यक्त केले आश्चर्य)

युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारमध्ये विमान वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळच्या सार्वजनिक वाहक एअर इंडियासाठी मोठ्या संख्येने विमान भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप या खटल्यात सुरुवातीला करण्यात आला होता. एअर इंडियासाठी सुरू असलेला अधिग्रहण कार्यक्रम असूनही सीबीआयने अधिकाऱ्यांवर विमान भाडेतत्त्वावर घेतल्याचा आरोपही केला.

तपासात अशी उदाहरणे अधोरेखित केली गेली ज्यामध्ये लीज करारांमध्ये लवकर संपुष्टात येण्याच्या कलमांचा अभाव होता, ज्यामुळे नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसीआयएल) महत्त्वपूर्ण खर्च केल्याशिवाय त्यांना समाप्त करू शकत नाही. शिवाय, अनेक महागडी विमाने पुरेशा पायलट व्यवस्थेशिवाय भाडेतत्त्वावर घेतल्याचे उघड झाले, ज्यामुळे एअर इंडियाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर भाष्य करताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मागणी केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना माफी मागावी. भाजपने यूपीए 2 सरकारवर केलेले खोटे आरोप खोटे निघाले. केवळ प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांनी हे आरोप केल्याचेही रमेश यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही भावना व्यक्त करताना म्हटले.