CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत (Caste Census) योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी सांगितले. शिंदे यांनी नागपुर येथील रेशीमबाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RRS) संस्थापक के.बी.हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक एम.एस.गोळवलकर यांच्या स्मृतींना भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. आरएसएसचे पदाधिकारी श्रीधर गाडगे यांनी मंगळवारी जातीवर आधारित जनगणना होऊ नये, असे म्हटले होते. यातून काय साध्य होणार, असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य समोर आले.

विदर्भाचे सहसंघचालक गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, जातनिहाय जनगणनेमुळे काही लोकांना राजकीय फायदा होऊ शकतो, कारण यातून विशिष्ट जातीची लोकसंख्या किती आहे याची आकडेवारी मिळेल, परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते फायदेशीर नाही. त्यावर शिंदे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि त्याची संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत. येथे सर्व समाज आणि जाती एकत्र राहतात, एकत्र काम करतात आणि एकत्र उत्सव साजरा करतात. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेतल्यानंतर जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.’

भारतीय जनता पक्षाचे (BJP) मंत्री आणि आमदार दरवर्षी नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मारकांना भेट देतात. नागपुरात पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकाकडून लोकांची आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा कशी घेतो हे सांगितले. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांची हिंदुत्व विचारधारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य आणि मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय आदर्शांचेही त्यांनी कौतुक केले. (हेही वाचा: Jagdeep Dhankhar Mimicry Row: मुंबई मध्ये भाजपा नेते, मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी उपराष्ट्रपतींच्या नक्कल प्रकरणी MP Rahul Gandhi, Kalyan Banerjee विरोधात तक्रार दाखल)

दरम्यान, संपूर्ण देशात काँग्रेससह विरोधी पक्ष जात जनगणनेची मागणी करत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) जात जनगणना अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. संघाचे पदाधिकारी श्रीधर गाडगे यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडले आहे. त्यांनी जातीवर आधारित जनगणना नको असे म्हटले आहे.