IIT Mumbai Video Recording Row: कॅन्टीन कर्मचाऱ्याकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे बाथरुममध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग? आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा आरोप
IIT Mumbai (File Image)

पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील वसतिगृहातील मुलींचे बाथरुममध्ये अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डींग (Chandigarh Girls Hostel MMS Row) केल्याची कथीत घटना जोरदार चर्चेत आहे. याच वादात आता आयआयटी मुंबईचे नाव (IIT Mumbai Video Recording Row) आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Mumbai) मुंबईच्या विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या माध्यमातून वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे बाथरुममध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात आले आहे. 'मिड डे डॉट कॉम'ने याबाबत वृत्त दिले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) संबंधित कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केल्याचे वृत्त आहे.

आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थिनीने पवई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, आयआयटी मुंबईच्या एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने हॉस्टेल 10 (एच10) बाथरूममध्ये रविवारी रात्री गुप्तपणे तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. पोलिसांनी या प्रकरणी कलम 354C (व्हॉयरिझम) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. ही घटना घडली त्याच रात्री आयआयटी मुंबईचा एक विद्यार्थी आणि काही प्रतिनिधींनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. (हेही वाचा, Chandigarh Girls Hostel MMS: विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठातील एमएमएस Video मुळे हादरले पंजाब, विद्यार्थ्यांची निदर्शने)

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “कॅन्टीन कर्मचाऱ्याविरुद्ध आयपीसी कलम 354सी (व्हॉय्युरिझम) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे.

H10 मधील एका बाथरुममध्ये खिडकीच्या फटीतून कोणीतरी तिला पाहात अलल्याचे आणि तिचे चित्रिकरण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनीने अलार्म वाजवला. पीडितेने तातडीने वसतिगृह परिषद आणि अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. विद्यार्थीनिच्या तक्रारीनंतर आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांचे फोन तपासले.

IPC कलम 354C काय सांगते?

भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) कलम 354C (voyeurism) या कलमाचा अर्थ सांगते. या कलमानुसार कोणताही पुरुष (प्रौढ) व्यक्ती एखादी महिला तिचे खासगी काम करत असताना किंवा त्या कामात ती व्यग्र असताना तिला चोरुन पाहतो किंवा तिची प्रतिमा कैद करतो. हे कृत्य तो स्वत:च्या मर्जी अथवा कोणाच्या सांगण्यावरुनही करत असेल आणि तसे सिद्ध झाल्यास तो गुन्हेगार संबोधला जातो. अशा प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीस एक वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कारावास अथवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. या कलमांतर्गत गुन्हेगारास शिक्षा झाल्या ती कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन वर्षांची असू शकते. तसेच, त्याला दंडही आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये ही शिक्षा सात वर्षांपर्यंतही असू शकते, असे हे कलम सांगते.