Protest | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करण्यासाठी दिल्ली मध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली असतानाच महाराष्ट्रात मात्र आदर्श पद्धतीने सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला. आज, 24 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मोताळा (Motala) ते बुलडाणा (Buldhana) असा 20 किलोमीटर पायी मोर्चा आज पार पडला. मोताळा येथून वाघजाळ, राजूरच्या घाटातून हा मोर्चा बुलडाण्यातील शाहीनबाग येथे पोहचला. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. CAA Protest: दिल्लीतील गोकुलपुरी येथे गोळीबारात 1 हेड कॉन्स्टेबल ठार, डीसीपी जखमी; अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे मदतीची मागणी

मटा च्या वृत्तानुसार, मोर्चाच्या आयोजकांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. नागरिकत्व कायदा भारतीय संविधानाला धक्का देणारा असून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. भारतात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना सीएए सारखा कायदा आणून भारतीयांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करताना अन्य देशातील पीडितांना भारतीय नागरिकत्व देण्यास कुणाची हरकत नाही मात्र या देशातील नागरिकांना त्याची कोणत्याही प्रकारची झळ पोहचू नये, अशी अपेक्षा मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, दिल्ली मध्ये रविवार २३ फेब्रुवारी पासूनच CAA विरुद्ध आंदोलन पेटले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर येत आहे. गोकुलपुरी येथे आज झालेल्या गोळीबारात रतनलाल या पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे, तर डीसीपी अमित शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे शांतपणे काढण्यात आलेल्या या मोर्च्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.