Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिसांनी एक जोडपे आणि त्यांच्या मुलासह तीन जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या नावाचा वापर करून आरोपींनी लोकांना आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी लोकांना आपण मंत्र्याचा भाऊ असल्याचे भासवत आणि सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत. दुसरे म्हणजे स्वस्त किंमतीत सोन्याचे दागिने मिळवून देतो असे सांगूनही त्यांनी लोकांकडून रोकड घेतली. आता या तिघांनाही कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

राजन गडकरी (Rajan Gadkari) आणि त्यांचा मुलगा आनंद गडकरी (Anand Gadkari) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी दाखवलेल्या अमिषानंतर लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, नाही सोन्याचे दागिने मिळाले. त्यानंतर लोकांनी गडकरी कुटुंबीयांकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. जनतेचा दबाव आणि रोष पाहून राजन, त्याची पत्नी, मुलगा आनंद आणि आनंदचा चार वर्षाचा मुलगा त्यांच्या डोंबिवली निवासस्थानातून पळून गेले. नंतर आनंदची पत्नी गीतांजलीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, गीतांजलीने माहिती दिली की तिचे खाते तिचा पती आणि सासऱ्याने अवैध व्यवहारासाठी वापरले होते. पोलिसांनी फसवणूक झालेल्या पीडितांपैकी अमोल पळसमकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गीतांजली या प्रकरणात साक्षीदार झाली आहे. तिने दावा केला आहे की, तिच्या कुटुंबाकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत तिला कोणतीही माहिती नव्हती. (हेही वाचा: MSEB कडून ग्राहकांना बसणार विजेचा झटका! उद्यापासून सुरु करणार थकित वीज बिलांची वसुली)

गीतांजलीने पोलिसांना विनंती केली की त्यांनी तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा शोध घ्यावा. या फसवणूकीत सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विष्णू नगर पोलिसांनी दोन पथके तयार केली. आता पोलिसांनी आरोपींना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की, या लोकांनी बर्‍याचजणांची फसवणूक केली आहे. अशा लोकांनी आमच्याकडे संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या फसवणूकीची योग्य तपासणी करू शकू.