Buldhana Bus Accident: बुलढाण्यातील बस अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Buldhana Accident (PC - ANI)

समुद्धी महामार्गावर 30 जून 2023 रोजी नागपूरवरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा बुलढाण्यातील सिंदखेडराजा शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 7 प्रवाशी जखमी झाले. विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात हा चालकाच्या चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी बस चालक शेख दानिश याने मद्यप्रान केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दानिश याच्या शरीरात मद्याचे प्रमाण मान्य क्षमतेनुसार 30 टक्के जास्त होते असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एबीपी माझाने याबाबतच वृत्त दिलं आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, ही माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! वरळी सी फेसमध्ये गोणीमध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह)

बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. विशेष बाब म्हणजे बसचा अपघात हा टायर फुटल्याने झाला असा दावा बसचालक शेख दानिश याने केला होता.

दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.  आता विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातासंबंधी वेगवेगळे अहवाल समोर येत असून हा अपघात मानवी चूक आणि बेजबाबदारपणाने गाडी चालवण्याने घडला असावा, असेच तपशील आता समोर येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख याला अटक करून ताब्यात घेतलं असून त्याच्यावर आयपीसीचे कलम 304 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम 134,184 आणि 279 लावण्यात आले आहेत.