विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'पेनड्राईव्ह बॉम्ब'च्या माध्यमातून महाविकासआघाडी सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. या आरोपांची राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने या आरोपांवर भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरते आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) विधिमंडळात लक्ष्यवेधी झाल्यावर यावर बोलणार आहेत. तत्पूर्वी वळसे पाटील यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या आरोपाला मी विधानसभेच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार उत्तर देणार आहे. माझे उत्तर काय असेल यासाठी आपल्याला माझ्या भाषणातूनच कळेल.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असे आणखी किती बॉम्ब आहेत आणि ते कधी व कसे फुटतील याबाबत ते स्वत:च सांगू शकतील असे वळसे पाटील म्हणाले. दरम्यान, महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतरत दिलीप वळसे पाटील सभागृहात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Session 2022: विधानसभेत विरोधक सरकारला आज पुन्हा घेरण्याच्या तयारीत, फडणवीसांच्या चौकशीवर भाजपचा आक्रमक पवित्रा)
दरम्यान, दिल्ली येथे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीत आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या दिल्लीतील भेटीत राज्यातील घडामोडींवर काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.