मुंबई मध्ये  BMC लवकरच CBSE, ICSE मंडळाच्या शाळा सुरू करण्याच्या तयारीत; शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्ताव
Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

दिवसेंदिवस स्पर्धात्मक होत असलेल्या युगात टिकून राहण्यासाठी इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवण्याकडे पालकांचा ओढ आहे. यामध्येही स्टेट बोर्ड पेक्षा सीबीएसई आणि आईसीएसई मंडळाच्या शाळांमध्ये मुलांची नोंदणी करण्याकडे शहरी पालकांचा कल आहे. हे सारे पाहता आता बीएमसी म्हणजे मुंबई महानगर पालिकेतही केंद्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. नुकत्याच पालिकेमध्ये झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये CBSE, ICSE शाळांसाठी आग्रह धरण्यात आला असून त्यावर चर्चा करून प्रस्ताव बनवण्यात आला आहे.

मुंबईच्या महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पालिका प्रशासन विविध उपक्रम राबवते. आता त्यामध्ये केंद्रीय मंडळाच्या शाळा हा नवा घाट घालण्यात आला आहे. चांगले शिक्षण आणि स्टेट बोर्डपेक्षा इतर मंडळांचा पर्याय खुला व्हावा याकरिता मुंबईत एक सीबीएसई आणि एक आयसीएसई शाळा सुरू करावी असा मानस शिवसेना पक्षाचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केला आहे. आता या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावानंतर पुढील प्रक्रिया आणि परवानगी घेण्याला सुरूवात झाली आहे.

मागील वर्षी 25 बीएमसी शाळा राज्यातील नवं Maharashtra International Education Board मध्ये सहभागी करण्यात येणार होत्या. मात्र ज्यावेळेस शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा खर्च आणि सह्भागी होण्यासाठी आवश्यक शुल्क भरण्यासाठी सांगितले तेव्हा नव्या बोर्डमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये काही अर्थ नसल्याचं बीएमसीने म्हटलं होतं.