महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी (Bakrid 2020) बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर सुरु होते. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी बकरी ईदसाठी मशीद उघडणे आणि कुर्बानी देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. यातच मुंबई महानगरपालिकेने बकरी ईदच्या कुर्बानीबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, देवनार कत्तलखान्यात बकरी ईद निमित्त 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान प्रतिदिन 150 म्हशींच्या धार्मिक कुर्बानीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक धार्मिक, सांकृतिक, सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध लावण्यात आली आहेत. यामुळे यावर्षी बकरी ईदच्या निमित्त मुस्लिम बांधवाना कुर्बानी देता येणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या परवानगीमुळे मुस्मिम बांधवाना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात गणेशोत्सव आणि बकरी ईद सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai Today Case: मुंबईत आज 1 हजार 100 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 53 जणांचा मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
Brihanmumbai Municipal Corporation issues fresh directions permitting religious sacrifice of 150 buffaloes per day from 1st to 3rd August for Eid-ul-Adha between 6 am to 6 pm
at the Deonar abattoir.
— ANI (@ANI) July 31, 2020
तसेच, भारतात येत्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून धार्मिक कुर्बानी दिली जाते. मात्र, यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.