Shiv Sena Dasara Melava 2022: शिवजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचाच आवाज, शिवसेना दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी
Uddhav Thackeray | (File Image)

'माझ्या तमाम हिंदू.. माता.. आणि भगिनींनो.' हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खास आवाजातील शब्द पुन्हा एकदा शवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर घुमणार आहेत. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava 2022) घेण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (23 सप्टेंबर) निकाल दिला. या निकालानुसार 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी वापरण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई हायकोर्टाने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचा अर्ज फेटाळल्याबद्दल हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारल्याचीही माहिती पुढे येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात 'शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार म्हणजे होणारच' असे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेतेही दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानारवरच होईल असा विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे आले आहे.

हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोश करण्यात आला. हायकोर्याने न्याय दिल्यानंतर तरी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या वाटेत काळी मांजरे सोडण्याचे उद्योग बंद करावे, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. तर, सत्याचाच विजय होतो,  अशा भावना मनिशा कायंदे आणि शिवसेना प्रवक्त्या सुष्मा अंधारे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिवसेना आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. याचाच अर्थ असा की, शिवाजी पार्क मैदानावर एकनाथ शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली नाही.