Chandrapur: चंद्रपूर येथे आपल्या चार वर्षाच्या मुलासह आईस्क्रीम घेण्यासाठी निघालेली गर्भवती महिला गुरुवारी सकाळी नदीच्या पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे या मृत महिलेच्या मृतदेहाशेजारी तिचा चार वर्षाचा चिमुरडा रात्रभर बसून होता. सुषमा काकडे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बल्लारपूर येथील टीचर्स कॉलनी येथील घरातून मुलगा दुर्वंश याच्यासोबत निघाल्या होत्या. मात्र, त्या वेळेत परत आल्या नाहीत, अशी माहिती पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली.
मृत महिलेच्या पतीचं नाव पवनकुमार काकडे असं आहे. ते बँक कर्मचारी आहेत. सुषमा काकडे यांच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, नंतर त्यांनी बल्लारपूर पोलिस स्टेशन गाठले. (हेही वाचा - दिव्यांग महिलेला खारच्या रजिस्टर ऑफिसमध्ये 2 मजले खुर्चीवर बसवून वर न्यावं लागलं; Devendra Fadnavis कडून कारवाईची हमी)
राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाजवळ सुषमाचा मृतदेह सापडल्याची माहिती काही लोकांनी पवनकुमार आणि त्याच्या नातेवाईकांना दिली. गुरुवारी पहाटे 4 वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुर्वंश व्यथित होऊन मृतदेहाजवळ बसला होता.
प्राथमिक अंदाजानुसार, सुषमा बुधवारी रात्री उशिरा पुलावरून चिखलाच्या भागात पडली. तथापि, मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांची साखळी शोधण्यासाठी सर्व बाजू तपासल्या जात आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे परदेसी यांनी सांगितले.