अहेरीवरून तेलंगणातील गुडेम येथे जाणारी नाव प्राणहिता नदीत उलटली; तेलंगणातील 2 जण बेपत्ता
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

अहेरीजवळील प्राणहिता नदीमध्ये (Pranhita River) आज सकाळीच्या सुमारास नाव उलटली. (Boat Accident) या नावेत 4 प्रवासी, 1 नावाडी आणि त्याचा सहायक असे 6 जण होते. ही नाव अहेरीवरून तेलंगणातील गुडेम येथे जाण्यासाठी निघाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणहिता नदीत काही अंतर पार केल्यानंतर लगेचचं ही नाव उलटली. यातील नाव चालक, सहाय्यक व इतर 2 जण पाण्याबाहेर आले. मात्र, आणखी 2 जण बेपत्ता आहेत. (हेही वाचा - गणपती विसर्जन करताना नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू, 5 थोडक्यात बचावले)

या नावेत बसलेले 4 जण तेलंगणा राज्यातील वन कर्मचारी आहेत. यात मुंजम बालकृष्णा (रा. कागजनगर) आणि सुरेश बाणावत (रा. केरझारी ता. अदिलाबाद) हे दोघे तेलंगणाच्या करजेली रेंजचे वनरक्षक आहे. हे दोघे हेमलकसा फिरण्यासाठी आले होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (हेही वाचा - आंध्र प्रदेश: गोदावरी नदीत पर्यटन नाव उलटल्याने बरेच प्रवासी बुडाल्याची शक्यता)

पाण्याच्या तीव्रतेमुळे अनेकदा नाव उलटण्याच्या घटना घडत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत एक पर्यटन नाव उलटल्याची घटना घडली होती. यामुळे या नावेमधील अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. यात एकूण 60 प्रवासी होते. तसेच गणेशोत्सवादरम्यान, भोपाळ येथे ही बोट पलटून 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती.