यंदाचा गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-पुणे शहरांत गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दोन्ही शहरांत हजारोंच्या संख्येने गणपती मंडळे उभी राहतात. मात्र ठिकठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांमुळे (Hawkers) नागरिकांना या काळात बराच त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून म्हणून शहरात ठिकठिकाणी फलक लावून ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर केले आहेत. या क्षेत्रात फेरीवाले आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गणपतीच्या काळात फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत.
आता गणपतीच्या काळात फेरीवाल्यांची मनमानी चालणार नाही. 2017 साली प्रभादेवी स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईमध्ये महापालिकेने फेरीवाल्यांसाठी 89 हजार जागा निश्चित केल्या. यासाठी फेरीवाल्यांना स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना घेण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याची मुदत 25 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त 16 हजार फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे. (हेही वाचा: मुंबईची शान CSMT परिसर होणार फेरीवाले, भिकारी आणि गर्दुलेमुक्त; 1 मे पासून नियम लागू)
गेल्या काही महिन्यांपासून ही परवाना देण्याची प्रक्रिया धीम्या गतीने सुरु आहे. या दरम्यान फेरीवाल्यांसाठी ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या मुंबईमध्ये एकट्या दादरमध्ये तब्बल 2000 फेरीवाले आहेत. आता गणपती, त्यानंतर नवरात्र, नंतर दिवाळी अशा सणांच्या काळात फेरीवाल्यांच्या संख्येत अजून वाढ होते. ही बाब ध्यानात घेऊन आता फेरीवाल्यांवर कारवाई होणार आहे.