File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईसारख्या (Mumbai) धकाधकीच्या शहरात जिथे मोकळा श्वास घ्यायला जागा नाही, अशा ठिकाणी शुध्द हवेची अपेक्षा करणे तर चुकीचे आहे. हीच समस्या ओळखून दिवसभर प्रदूषण, रहदारी यांनी त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोकळा श्वास आणि शुद्ध हवा घेण्यासाठी महानगरपालिकेने (BMC) एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमधील अनेक बागबगीचे, पार्क (Park) आता चोवीस तास खुले राहणार आहेत. याबाबत ट्विट करत बीएमसीने माहिती दिली आहे. महानगरपालिकेने एकूण 24 बगिच्यांची यादी जाहीर केली आहे जे 24x7 राहणार आहेत.

याधी 28 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेने एक ट्विट करत मुंबईमधील काही गार्डन्स 16 तास खुले राहणार असल्याची माहिती दिली होती. निसर्गासोबत आधीक वेळ राहा म्हणत सकाळी 6 ते रात्री दहा 10 या काळात ही गार्डन्स सुरु राहणार होती. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले होते. त्यानंतर महानगरपालिकेने शहरातील काही गार्डन्स 24 तास खुले राहणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे अनेक नागरिकांना रात्रीही शांतता, निसर्ग, मोकळी हवा यांचा अनुभव घेता येणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपण आपल्या काही बागा 24 तास उघड्या ठेऊ शकतो का? असा प्रश्न बीएमसीला विचारला होता. आपल्याकडे चांगला प्रकाश आहे, सुरक्षा आहे. त्यामुळे काही गार्डन्स 24 तास उघडी ठेवली तर कष्टकरी लोकांना घरी जाताना ताजी हवा प्राप्त करण्याचा पर्याय निर्माण होईल असे ते म्हणाले होते. यावर बीएमसीने 24 गार्डन्स 24 तास खुले राहणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईमधील नागरिकांसाठी हा फार चांगला निर्णय असणार आहे.