मुंबई पोलिसांनी मंगळवारी शिवसेना (यूबीटी) (Shiv Sena (UBT)) नेते आणि महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या शाखा पाडण्याचे नेतृत्व करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोपआहे. या प्रकरणात पक्षाच्या चार कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक झाली आहे. वृत्तसंस्था एएनआयने मुंबईच्या वाकोला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, पोलिसांनी 15 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक झालेल्या चार जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) तब्बल 40 वर्षे जुन्या असलेल्या वांद्रे पूर्व येथील शिवसेना (Shiv Sena (UBT)) शाखेवर हातोडा चालवत ती जमीनदोस्त केली. ही शाखा बेकायदेशीर असल्याचे मुंबई महापालिकेचे म्हणने आहे. दुसऱ्या बाजूला कारवाई करताना शाखेत असलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा काढण्याची विनंती केली. मात्र, ती विनंती डावलून पालिका अधिकार्यांनी शाखेचे पाडकाम केले. यावर आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान, पालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण (BMC Officer Assault Case) झाली. यावरुनच संबंधीत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी 'बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन'ने केली होती.
दरम्यान, याच प्रकरणात आमदार अनिल परब यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (UBT) गटाने आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एच पूर्व विभागावर मोर्चा काढला होता. याच वेळी एक शिष्टमंडळ पालिकेच्या वरिष्ठांना भेटायला गेले होते तेव्हा एका अभियंत्याला मारहाण झाल्याचे समजते. (हेही वाचा, Radhakrishna Vikhe Patil: लाचखोर IAS अनिल रामोड, यांना कोणाचे अभय? अंबादास दानवे यांनी पुढे आणले पत्र; राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बोट)
ट्विट
BMC official alleged assault case | Four arrested accused remanded to 14 days judicial custody till 11th July by Bandra court
Anil Parab of Sena (UBT) whose name is mentioned as an accused in the FIR registered in the case is likely to approach Sessions Court, Mumbai to apply…
— ANI (@ANI) June 27, 2023
अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली विविध मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला होता. यात वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाची तोडण्यात आलेली शाखा, वांद्रे, सांताक्रुझ, खार आणि इतर भागांमध्ये सातत्याने कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा आणि इतर अनेक मुद्द्यांवर हा मार्चा काढण्यात आला होता. या वेळी परब यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने सहाय्यक पालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी शिवसैनिक आणि महिला शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता थेट शाखा पाडल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसरर दणाणून गेला.