Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

वेळ आल्यास मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election 2025) स्वबळावर एकटे लडू असे म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थात त्यांनी ठोस काहीही भाष्य केले नसले तरी महाविकासआघाडीसाठी (MVA) हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार () यांना विचारले असता, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली दोनच दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत त्यांनी स्वबळाबाबत मत मांडले. मात्र, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका नव्हीत, असे पवार म्हणाले. कोल्हापूर येथे आज (शुक्रवार, 24 जानेवारी) सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अमित शाह यांच्या वक्तव्याची विरोधकांकडून दखल

शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत वेगवेगल्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षात एक मतप्रवाह स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढावी असा आहे. त्यात काही वेगळे नाही. आमच्याही काही घटक पक्षांमध्ये त्याबाबत मतप्रवाह आहे. पण असे असले तरी त्यात कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करत असलेल्या टीकेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शाह जे काही बोलतात त्याची विरोधी पक्ष दखल घेत आहेत. याच वेळी पत्रकारांनी अजित पवार आणि आपली अशा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असे विचारले असता पवार यांनी या प्रश्नावर सखोल भाष्य करणे टाळले. (हेही वाचा, ठाकरे गटाच्या मेळाव्यात वाजला राज-उद्धव जोडीच्या उल्लेखाचा पोवाडा; उपस्थितांचे कान टवकारले (Watch Video))

उद्धव ठाकरे यांचे कौतुक

उद्धव ठाकरे यांचे कौतुक करताना शरद पवार यांनी म्हटले की, त्यांनी आपली हिंदुत्त्वाची भूमिका वारंवार जाहीर केली आहे. तसेच, भाजपच्या हिंदुत्त्वाबाबत ते नेहमीच बोलत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपलाच हक्क आहे असे, दोन्ही शिवसेनांना वाटते पण, माझ्याकडील माहिती अशी की, काल मुंबईत झालेल्या दोन सभांपैकी उद्धव ठाकरे यांच्या सभेला अधिक गर्दी होती. त्यांनी स्वबळाची भूमिका माझ्याकडेही व्यक्त केली आहे. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, BMC Election 2025: उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार; Sanjay Raut यांची मोठी घोषणा)

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक केव्हा होणार हे अद्यापही अनिश्चित आहे. चर्चा आहे की, ती यंदा म्हणजेच 2025 मध्ये होईल. पालिकेची मुदत उलटून गेली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक केव्हा होणार याबातब अद्यापपर्यंत तरी कोणतेही संकेत नाहीत. मुंबई महापालिकेची मुदत तर केव्हाच संपून गेली आहे. मात्र, न्यायालयी खटल्याचे कारण पुढे करत ही निवडणूक लांबणीवर टाकली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.