मुंबई: आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची बदली, कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली; महात्मा गांधी यांच्याविषयी उपरोधिक ट्विट भोवल्याची चर्चा
Nidhi Choudhary, IAS; Mahatma Gandhi (photo credit: archived, edited, representative image)

महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांच्याबाबत उपरोधिक ट्विट करणे हे आयएएस अधिकारी निधी चौधरी (Nidhi Choudhari)  यांना चांगलेच भोवल्याची चर्चा आहे. निधी चौधरी यांनी केलेल्या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. निधी चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिका उपायुक्त ( BMC Deputy Commissioner) पदावर असलेल्या निधी चौधरी यांची मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. राज्याचे जल संपदा मंत्री गिरिश महाजन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, निधी चौधरी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महात्मा गांधी यांची प्रतिमा चलनी नोटांवरुन हटविण्यात यावी, अशी उपरोधिक मागणी करत निधी चौधरी यांनी ट्विटरवरुन नथुराम गोडसे याचे आभार मानले होते. या ट्विटमुळे निधी चौधरी चर्चेत तर आल्याच पण वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या. वाद आणि चर्चेची कोणार पाहता निधी चौधरी यांनी आपले ट्विट डिलीट करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या ट्विटची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. निधी चौधरी यांना सरकारने कारणे दाखवा नोटीसही पाठविण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक)

काय होतं आयएएस अधिकारी निधी चौधरी यांचं ट्विट?

'150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारा इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948' अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता. दरम्यान, ट्विटनंतर निर्माण झालेल्या वादानंतर आपण आपलं हे ट्विट केवळ उपरोधिकपणे केल्याचेही चौधरी यांनी म्हटलं होतं.

निधी चौधरी यांच्या ट्विटनंतर विरोधी पक्ष खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली होती. या पार्श्वभूमिवर चौधरी यांची बदली करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.