BMC Budget 2019: मुंबई महानगरपालिकेचा नवा अर्थसंकल्प मुंबईकरांसासाठी दिलासादायक; करवाढ नाही, नागरी सुविधा, BEST साठी खास तरतूदी
BMC Budget 2019 (Photo Credit: File Photo)

BMC Budget 2019: मुंबई पालिकेचे आयुक्त अजोय मेहता (Ajoy Mehta) यांनी आज 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पहिल्यांदाच नागरी सेवांसाठी केलेली तरतूद 30,000 कोटींच्या घरात आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही, त्यामुळे मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प काहीसा दिलासादायक ठरत आहे. (BMC Budget 2019: मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर; 'या' आहेत अर्थसंकल्पातील खास तरतूदी)

नव्या अर्थसंकल्पात केलेल्या खास तरतूदी:

# बेस्ट बसच्या सेवेला नवे रुप देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 34.10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतींसाठी 10 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

# मुंबई पालिकेने मफ्फतलाल मिल प्लॉटजवळील 7 एकर जमिनीची खरेदी केली आहे. या जमिनीवरील विकास कामांना मे 2019 पासून सुरुवात करण्यात येईल. येथील प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी सुमारे 110.78 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

# मुंबईतील रस्ते दुरुस्तीसाठी 1520 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

# या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत अभिनयावर जोर देण्यात आला आहे. कचरा गोळा करणे, वाहून नेणे, त्याची विल्हेवाट लावणे आणि कचऱ्याचा पुर्नवापर करणे या सर्व बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.यासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडवर एनर्जी प्लांटची उभारणी करण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 मे पासून या कामाला सुरुवात केली जाईल.

# नव्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी एकूण 3601.86 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

# मागील आर्थिक वर्षात 2018-19च्या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चासाठी 9.522 कोटी रुपये पालिकेने दिले होते.

# महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विकास प्रकल्पांसाठी 11,480.42 कोटींची तरतूद केली आहे. यात जसे की रस्ते, नाले पूल, घन कचरा व्यवस्थापन आणि जल प्रकल्प इत्यादींचा समावेश आहे.

# गोरेगाव-मुलूंड लिंक रोडसाठी 100 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.

# सागरी किनारा मार्गांसाठी अर्थसंकल्पात 1,600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

# विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

# यंदाच्या बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही किंवा नवे कर लावण्यात आलेले नाहीत.

मुंबई महानगरपालिकेचा हा नवा अर्थसंकल्प 30,692.59 कोटींचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे बजेट 27,258 कोटींनी अधिक आहे. मुंबईच्या महापौरांसाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे 2,745 चौरस मीटर क्षेत्रात नवं निवासस्थान बांधण्यात येईल. याचं काम 2019-20 मध्ये सुरु होईल. यासाठी सुमारे एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे.