वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात रंगणार पहिलावहिला 'बीकेसी आर्ट फेस्टिवल'; लवकरच जाहीर होणार तारखा
Representative Image (Photo Credits: The City Story)

मुंबईत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असा समजला जाणारा फेस्टिवल म्हणजे 'काळा घोडा फेस्टिवल' (Kala Ghoda Festival). या फेस्टिवलच्या धर्तीवर आता वांद्रे कुर्ला संकुल परिसरात देखील पहिल्यावहिल्या आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. 'बीकेसी आर्ट फेस्टिवल' (BKC Art Festival) असे या महोत्सवाचे नाव असेल. या फेस्टिवलच्या आयोजनाची जागा आणि तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. मात्र हा भव्य कला महोत्सव डिसेंबरमध्ये आयोजित करण्यावर एमएमआरडीएच्या वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र याच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसून लवकरच त्या जाहीर केल्या जातील असे सांगण्यात येत आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, हा महोत्सव आठवड्याभराचा असेल.

या महोत्सवात कला प्रदर्शन, विविध कलाकृती, संगीत आणि नृत्य कार्यक्रम, थिएटर, शॉपिंग स्टॉल आदींचा समावेश असेल. तसेच, मुंबईतील इतर प्रसिद्ध फेस्टिव्हलप्रमाणे या महोत्सवातही भव्यता जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. Kala Ghoda Art Festival 2020: मुंबईच्या सांस्कृतिक विश्वातील 'काळा घोडा कला महोत्सवा'ला 1 फेब्रुवारीपासून सुरुवात; पहा काय आहे 21 व्या पर्वाचे खास आकर्षण

हा महोत्सव आणखी आकर्षक करण्यासाठी त्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश करण्याचाही विचार सुरू असून, लवकरच याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आर्ट फेस्टिव्हलसाठी बीकेसीसारखी अन्य उत्तम जागा नाही असे मत कलाक्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे बीकेसीचा हळूहळू कायापालट होत आहे. या भागात मेट्रो प्रकल्पाचे काम देखील जोरात सुरु आहे. सुनियोजित परिसर, मोकळी जागा या जमेची बाजू असलेल्या बीकेसीमध्ये आगामी काळात मेट्रोच्या दोन मोठ्या प्रकल्पांसह ई-बाइक्स सुविधा, बीकेसी कनेक्टर, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड असे प्रकल्प येऊ घातले आहेत.