केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावात काँग्रेसला 'अच्छे दिन' आले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपला फटका बसला आहे. धापेवाडा हे गडकरी यांचे मूळ गाव. पाचगाव हे त्यांचे दत्तक गाव. दोन्ही गावात भाजपचा थेट पराभव झाला. दोन्ही गावात काँग्रेस पुरस्कृत उमेदावारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही गावात काँग्रेसच विजयी झाली अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे धापेवाडामध्ये एकूण १७ जागांपैकी भाजपला खातेही उघडता आले नाही.
मुख्यमंत्री दत्तक गावातही कमळ कोमेजले
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या फेटरी आणि सुरादेवी या गावातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. फेटरी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. तर, सुरादेवी हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतले आहे. या पराभवामुळे भाजप हा पुन्हा शहरी तोंडवळ्याचा पक्ष बनत असून, त्याची ग्रामीण भागावरची पकड सुटत चालली असल्याची चर्चा सुरु आहे.
भाजपला बंडखोरीचा फटका
धापेवाडा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या संजय शेंडेंचा पराभव केला. तर, पाचगावात काँग्रेसच्या उषा गंगाधर ठाकरे यांनी भाजपसमर्थक रजनी लोणारे यांचा पराभव केला. दरम्यान, पाचगावमध्ये भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागला. येथून भाजपतील ४ महिला कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती.