विधानसभेमध्ये 200 जागांचा टप्पा पार करणारच, असा प्रचार महायुतीने केला होता. मात्र कॉंग्रेस आणि शरद पवार यांनी युतीला चांगलच दणका दिला आहे. सध्या 109 जागांवर आघाडीने आघाडी घेतली आहे, तर महायुती 157 जागांवर आघाडीवर आहे. भलेही राज्यात युतीचे सरकार येवो मात्र आघाडीने निर्माण केलेले कडवे आव्ह्वान हे लक्षवेधी ठरले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या त्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराला यश मिळवता आले नाही. तर फडणवीस सरकारमधील काही दिग्गज मंत्र्यांना धक्कादायक पराभव प्राप्त झाला आहे.
> कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. महत्वाचे म्हणजे भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा त्यांनी इथे पराभव केला आहे. राम शिंदे हे जलसंवर्धन मंत्री आहेत. महायुतीला या मतदारसंघातून फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र एका तरुण रक्ताने त्या अपेक्षा धुळीला मिसळल्या आहेत.
> राज्यातील दुसरा सर्वात धक्कादायक पराभव ठरला आहे तो पंकजा मुंडे यांचा. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला आहे. या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे या महिला व बालविकास मंत्री आहेत.
> मावळ मतदारसंघातून भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी भेगडेंचा पराभव केला आहे.
(हेही वाचा: अजित पवारांचा दणदणीत विजय, बारामतीचा गड पुन्हा अबाधित; गोपीचंद पडळकर यांच्यासोबत इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त)
> पुरंदर मतदारसंघातून शिवसेनचे विजय शिवतारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कॉंग्रेसचे संजय जगताप इथे विजयी ठरले आहेत.
> शिवसेनेचे दुसरे मंत्री अर्जुन खोतकर यांचा जालना मतदारसंघातून पराभव झळा आहे. इथेही कॉंग्रेसच्याच कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला आहे.
> बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये लढाई पाहायला मिळाली, इथे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते, तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीवाकडून मैदानात होते. सकाळी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर आघाडीवर होते मात्र आता संजय क्षीरसागर यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.