कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुशील कुमार शिंदे यांनी भाजपाकडून त्यांना आणि त्यांची लेक प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना ऑफर देण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्याची चर्चा होत असताना आह संध्याकाळी भाजपा नेते चंद्रकांत पाटील देखील त्यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट मध्ये हुरडा पार्टी मध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी या ऑफरचा उल्लेख केला आहे. ''माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही' असे शिंदे म्हणाले आहेत.
'लहान मुलाला पहिल्यांदा आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालू लागतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले आहे.
सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर 100 वे मराठी नाट्यसंमेलन होणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेणार आहेत. राजकीय चर्चा होणार नसून नाट्यसंम्मेलनाच्या निमंत्रणासाठी भेट असल्याचे सांगितले जात आहे.