खासदार रावसाहेब दानवे यांचे वादग्रस्त विधान; 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले'
रावसाहेब दानवे (Photo Credit : Facebook)

आपल्या बेताल वक्त्यव्यांसाठी लोकप्रिय असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. आज सोलापूर येथे भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना दानवे साहेबांनी,‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले, त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ असे वक्त्यव्य केले. त्यानंतर दानवे साहेबांना प्रचंड मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. जवानांच्या ऐवजी अतिरेकी शब्द वापरूच कसे शकतात असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

त्यांच्या या विधानावर टीका करताना राष्ट्रवादीने ट्विट केले आहे की, हेच का भाजपचे बेगडी देशप्रेम?? देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अतिरेकी ठरवले. अशा आशयाचे हे ट्वीट आहे. या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर सोशल माध्यमावर विरोधी पक्षासह अनेकांनी टीका केली आहे.

दोन वर्षांपूर्वी तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना ”साले” संबोधल्याने दानवे वादात सापडले होते. ‘एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले’ असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य दानवेंनी केले होते.