भाजप खासदाराचा पराक्रम: सामुदायिक विवाहसोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांचे लग्न; अल्पवयीन मुलगाही चढला बोहल्यावर
सामुदायिक विवाहसोहळ्यात लावण्यात आलेले लग्न (संग्रहित - संपादित प्रतिमा)

भाजप खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या संस्थेकडून सामुहिक विवाहसोहळ्याबाबत घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विवाहाचे टारगेट पूर्ण करण्यासाठी चक्क आधीच लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा लग्न लावण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे हा विवाह सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. कपिल पाटील यांच्या मतदारसंघातील शहापूर येथे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, यामध्ये 1101 विवाह लावून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र इतक्या प्रमाणात नोंदणी न झाल्याने अशाप्रकारे यावर शक्कल लढवण्यात आली.

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन, हिंदू सेवा संघ व राघोजी भांगरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहापुरात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तोंडावर आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 1101 जोडप्यांचे विवाह लावून देण्याचे टारगेट ठरवण्यात आले होते. या विवाहसोहळ्याच्या मोठमोठ्या जाहिराती करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. परंतु 1101 जोडपी उभी करण्याच्या नादात आधीच मुले असणाऱ्यांचे विवाह लावण्यात आले, तसेच अल्पवयीन मुलाचेही लग्न या सोहळ्यात झाल्याची माहिती मिळत आहे. हा मुलगा 19 वर्षांचा असून, यशवंत लहु बगळे असे याचे नाव आहे. (हेही वाचा : ‘अमित ठाकरे’च्या लग्नानंतर राज ठाकरे यांनी लावले 500 आदिवासी जोडप्याचं लग्न)

अगदी भोंगळ कारभारात हा विवाह सोहळा पार पडल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे मुलाचे तर दुसरीकडे पित्याचे लग्न लावण्याचा पराक्रमही इथे घडला. लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा लग्न लावून देण्यासाठी त्यांना भांडी आणि कपडे देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. ही घटना पाहता पब्लिसिटीसाठी या संस्थेने कायदा आणि नियमच धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे.