BJP MLA Ram Kadam met Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credits: ANI)

रिपब्लिक टीव्ही (Republic TV) चे संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेनंतर भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. अर्नब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या 9 पोलिसांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली. दरम्यान, अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून देशात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते.

आज सकाळी भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेत अर्नब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या 9 पोलिसांच्या निलंबनाची मागणी निवेदन सादर करुन केली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राम कदम यांनी लिहिले, "पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या 9 पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यासाठी आज सकाळी मी राज्यपालांची भेट घेतली. मला पोलिसांप्रती आदर, सन्मान आहे पण मारहाण मंजूर नाही."

Ram Kadam Tweet:

दरम्यान, राम कदम यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. अर्नब गोस्वामी यांच्या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करत 9 पोलिसांनी त्यांना मारहाण केली. आम्ही पोलिस आणि त्यांच्या खादी वर्दीचा सन्मान करतो. परंतु, महाराष्ट्र सरकारच्या दबावात येऊन वरिष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या 9 पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावे आणि यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे.

तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्नब गोस्वामी यांच्यासह संपूर्ण देशाची माफी मागावी आणि अर्नब गोस्वामी यांची सुटका करावी, असेही म्हटले आहे. असे न झाल्यास न्याय मागण्यासाठी राज्यपालांचे दरवाजे ठोठवावे लागतील, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र यावर महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रीया न मिळाल्याने आज राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली. (Arnab Goswami Arrest Case: हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीला पाठींबा देण्याचा भाजपला अधिकार- संजय राऊत)

दरम्यान, काल सकाळी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अलिबाग पोलीसांनी अर्नब गोस्वामी याला पनवेल येथील निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर भाजपने महाराष्ट्र सरकारवर टीकेचे झोड उठवली. मात्र शिवसेनेनेही सामना अग्रलेखातून भाजप टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.