Nitesh Rane Bail Granted: नितेश राणे यांना जामीन मंजूर, संतोष परब हल्ला प्रकरणात ओरोस कोर्टाकडून दिलासा
Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane Bail Granted) यांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्गातील ओरोस न्यायालयाने (Sindhudurg (Oros) District Court) 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे (CPR) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) संपल्यानंतरत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, छातीत दुखू लागल्याने नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे. नितेश राणे यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर आज (7 फेब्रुवारी) सुनावणी केली जाणार होती. मात्र, राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे शासकीय सुट्टी जाहीर केली. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज बंद राहिले. परिणामी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आज या अर्जावर सुनावणी झाली आणि त्यांना जामीनही मिळाला. (हेही वाचा, Nitesh Rane Chest Pain: नितेश राणे यांना छातीच्या दुखण्याचा त्रास; रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला रवाना)

नितेश राणे यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर ओरोस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, या रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ नसल्याने नसल्याने त्यांना कोल्हापूरला हालविण्याचा निर्णय घेण्यात आला. नितेश राणे यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याचे तसेच त्यांना मनक्याचा त्रास असल्याचे समजते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना इतर रुग्णालयात नेण्यात आले नव्हते. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे लक्षात येताच त्यांना कोल्हापूरला नेण्यात आले आहे. नितेश राणे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांचे एक पथकही त्यांच्यासोबत रवाना झाले.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी महाविकासआघाडीचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला 18 डिसेंबर रोजी झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलीसांनी दिल्ली येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटक होणार अशी शक्यता असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा तिन्ही कोर्टात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता ते सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाला शरण गेले आहेत.