भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नाराजीची परिणीती अखेर राजीनाम्यात झाली. आमदार डॉ. देशमुख यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ई-मेलच्या माध्यमातून मंगळवारी पाठवल्याची (2 ऑक्टोबर) सूत्रांची माहिती आहे. तसेच, ते स्वत: विधासभेत जाऊन अधिकृतरित्या आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे उद्या (बुधवार 3 ऑक्टोबर) सोपवतील असेही सूत्रांनी म्हटले आहे. ते नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार होते.
डॉ. आशिष देखमुख हे गेले काही दिवस भाजप आणि नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर ही चर्चा खरी असल्याचे त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने पुढे आले आहे. आपली नाराजी पक्ष आणि नेतृत्वाच्या ध्यानात यावी यासाठी त्यांनी अनेकदा पक्षावर आणि धोरणांवर टीकाही केली होती. पक्षाने त्याचा फारसा विचार केला नसल्याचे समजते. दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर लवकरच ते काँग्रेसवासी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, राजीनामा दिल्यावर ते सध्या नागपूरच्या (वर्धा) वाटेवर असल्याचे समजते.
#Maharashtra: BJP MLA from Katol Dr Ashish Deshmukh submits his resignation to the Speaker of the Maharashtra Legislative Assembly.
— ANI (@ANI) October 2, 2018
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेसुद्धा वर्ध्यात असलेल्या महात्मा गांधींच्या सेवाग्रामच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे वर्ध्यात राहुल गांधींची भेट झाल्यावर डॉ. आशिष देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.