महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहता सर्व विरोधकांनी राज्य सरकारावर फैलावर धरले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व विरोधी नेते सरकारवर टिकास्त्र सोडत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टिका केली. "जे आपल्या कुटूंबाचा सांभाळ करु शकले नाही ती व्यक्ती महाराष्ट्र आणि कोरोना बाधित रुग्णांना कसे सांभाळणार" असा सवाल राणेंनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुख्यमंत्री 'मातोश्री' बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसे सांभाळणार असेही ते यावेळी म्हणाले.
गेल्या काही काही दिवसांपासून महाराष्ट्राला कोरोना लस पुरवठा करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याची टीका राज्य सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ठाकरे सरकारमधील केंद्र सरकार मदत करत नसल्याची टीका करत आहे. मात्र, कोरोनावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारमधील नेते केंद्रावर टीका करत असल्याची पलटवार नारायण राणे यांनी केला.हेदेखील वाचा- Coronavirus Vaccination: मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवरील लससाठा संपला- BMC
तसेच लसीच्या तुटवड्याबाबत ठाकरे सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. वरुन विरोधीपक्षांनी राजकारण करु नका असे सांगतायेत. मात्र, केंद्राने मुबलक मदत करुनही ठाकरे सरकार राजकारण करत असल्याची टीका राणे यांनी केली.
"महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहे, एकाही मंत्र्यांनं आतापर्यंत रुग्णालय सुरु केलं नाही" अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच लॉकडाऊन करायला राज्य विकत घेतलंय का? असा सवाल करत केंद्राने सगळी मदत करुनही राज्य सरकार राजकारण करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे असे सांगून कुठल्याही खात्याचा कारभार सुरळीत सुरु नाही अशी जहरी टिका त्यांनी यावेळी केली.