कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा प्रवासाला बंदी असून जिल्हांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आहेत. अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना ई-पास (E-pass) घेणे गरजेचे असणार आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) संतप्त झाल्या आहेत. नवीन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास नसणार असं सांगितलं असाताना अचानक ई-पास का सुरु करण्यात आला असं म्हणत ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच यामुळे गोंधळ उडाला असून लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरु करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
चित्रा वाघ ट्विटमध्ये लिहितात, "काल परवा पर्यंत नवीन लॉकडाऊन नियमावलीत ई-पास नसणार असं सांगण्यात आलं होतं. आता अचानक ई-पास बद्दलच्या माहितीने लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी हेल्पलाईन सुरु केल्यास लोकांना मदत होऊ शकते. राज्यात सत्तराशे साठ लोक वेगवेगळं बोलत असून नुसता गोंधळ झाला आहे."
चित्रा वाघ ट्विट:
हे काय आता नविन....काल परवा पर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं आता अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार
एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा ज्याने लोकांना मदत होईल
राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत ज्याने नुसता गोंधळ झालाय https://t.co/qVpFXjnuD5
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 23, 2021
(हे ही वाचा: महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा लागणार E-pass; कसा कराल अर्ज? जाणून घ्या)
महाराष्ट्र पोलिसांनी ई-पास बद्दल माहिती देणारं ट्विट केलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे.