'प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले, आमचे नाही!' शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया
Chandrakant Khaire (Photo Credits: Twitter)

शिवसेनेकडून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) या दोनपैकी एकाला राज्यसभेवर (Rajya Sabha Election 2020) पाठवण्याची चर्चा होती. यातच शिवसेनेने आपल्या उमेदवाराची नाव घोषीत केले आहे. यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली आहे. यावर चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले. मात्र, आमचे काम दिसले नाही, असे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. याशिवाय, स्मशानात जाऊपर्यंत मी शिवसेनासोबतच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करतो आहे. त्यांना वाटते की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 7 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत जाणार आहेत. यातच शिवसेनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांनी खैरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, अखेरीस प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभा निवडणूक 2020 साठी उमेदवारी देण्यात आली आहे. यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, “प्रियंका चतुर्वेदी चांगले काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी 20 वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती, पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही.” असे चंद्रकांत खैरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. हे देखील वाचा-'भाजपाकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती' राज्यसेभेतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्य सभेची लॉटरी लागली आहे. चतुर्वेदी यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी सुरु असलेल्या सत्ता नाट्यात शिवसेनेची भूमिका काँग्रेस श्रेष्टींपर्यंत पोहचवण्याची मोठी जबाबदारी पार पाडली होती. तसेच त्या अदित्य यांच्या निकटच्या वर्तुळात गणल्या जातात. त्यामुळे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव, आशा जेष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असतानाही चतुर्वेदी यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे.