'भाजपाकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती' राज्यसेभेतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाने नुकतीच राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर केली असून या यादीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर खडसे यांना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
भारतीय जनता पक्षाने नुकतीच राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर केली असून या यादीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर खडसे यांना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'भाजपाकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि तेच समोर आले आहे', असे खडसे म्हणाले आहेत. भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातून 2 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यात माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा समावेश होता. तर, तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. परंतु, भाजपने एकनाथ खडसे यांच्या ऐवजी भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे भाजपात अंतर्गत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 7 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे 3, राष्ट्रवादीचे 2, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार राज्यसभेत जाणार आहेत. भाजपने आपल्या तिन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. सुरुवातीला एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भाजपने एकनाथ खडसे यांना डावलून भागवत कराड यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देऊन अनेक प्रश्नांना पूर्णविराम लावले आहेत. “भाजपाकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती आणि तेच समोर आलं आहे. मला केवळ राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांबाबत कुठलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणारे जेष्ठ नेते अमरिश पटेल यांना भाजपकडून विधानपरिषद पोटनिवडणूक उमेदवारीचे तिकीट
राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या एकूण 55 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने 25 फेब्रुवारीलाच घोषणा केली होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 17 राज्यातील 55 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ एप्रील 2020 मध्ये संपत आहे. कार्यकाळ समाप्त होत असलेल्या सदस्यांची सर्वाधिक सख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 7, तामिळनाडू 6, पश्चिम बंगाल आणि बिहार प्रत्येकी 5, गुजरात आणि आंध्र प्रदेश, राजस्थान प्रत्येकी 3 यांसह इतरही राज्यांचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2020 04:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

