आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आजपासून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यावर आज त्यांनी महत्वाची घोषणा केली ती आरे कारशेडबाबत (Aarey Metro Car Shed) आरे कारशेडच्या कामाला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. आरेबाबतची संपूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात होणार नाही असे त्यांनी सांगितले. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली. 'मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे' ही गोष्टही त्यांनी स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर भाजपकडून (BJP) टीका होत आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. 'मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे', असे मत मांडले आहे. ते पुढे म्हणतात, 'जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील.' मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दुसरीकडे आरेबाबत घेतलेला निर्णय हा घृणास्पद असल्याचे मत आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, 'धनुष्यबाणाच्या हातात घड्याळ बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार! 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे'

(हेही वाचा: मेट्रोला नाही तर, आरे कारशेडच्या कामाला स्थगिती- उद्धव ठाकरे)

दरम्यान, आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देऊन उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींचे मन जिंकली आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी अनेक झाडांची हत्या करण्यात आली होती. नैसर्गाला हानी पोहचवू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. आरेबाबतची संपूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कामाला सुरुवात होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.