राफेल डील: काहीच उरले नाही, आता काय लपवणार? चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही: उद्धव ठाकरे
राफेल डील:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

'राफेल डील'च्या मद्द्यावरुन भाजप सरकाला विरोधकांनी कोंडीत पकडेल आहेच. पण, आता एनडीएतील मित्रपक्षानेही 'राफेल डील'वरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. 'राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही. जे लपवायचे होते त्या अवास्तव वाढवलेल्या किमतीचाच भांडाफोड झाला. आधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी एका गालावर मारली व आता फ्रान्सच्या मीडियाने दुसऱ्या गालावर सणसणीतपणे मारली. राफेलचे नाणे खणखणीत नाही', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपप प्रणीत मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष असून, केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेतही सहभागी आहे.

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात ठाकरे यांनी राफेल मुद्यावरुन हल्ला चढवला आहे. 'सुप्रीम कोर्टानेच आता राफेल व्यवहाराची माहिती मागितल्याने राजकारणाला अधिक धार चढेल व त्यामुळे संरक्षण खात्याची प्रतिष्ठा अडचणीत येईल. त्यामुळे सरकारी प्रवक्त्यांनी थोडा दम खाऊन बोलावे हेच बरे. इकडचे तिकडचे सांगण्यापेक्षा राफेलच्या वाढलेल्या किमतीवरच बोला. सुप्रीम कोर्टानेच राफेल खरेदी नक्की कशी झाली याची माहिती मागवल्याने सरकारची गोची झाली आहे. आता सुप्रीम कोर्ट काही राहुल गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसच्या मुठीत नाही. राफेल लढाऊ विमान खरेदीचे भूत मोदी सरकारच्या मानगुटीवर बसले आहे. भाजपच्या किंवा सरकारच्या प्रवक्त्यांनी कितीही जंतर मंतर व चेटूकगिरी केली तरी हे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही. बोफोर्स तोफा खरेदीच्या बाबतीत जे घडले तेच राफेलच्या बाबतीत घडताना दिसत आहे', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

'राहुल गांधी जी माहिती मागत होते, तीच माहिती आता सुप्रीम कोर्टाने मागितली आहे. हवाई दलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात द्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. आता सरकार काय करणार आहे? राहुल गांधी हीच माहिती उघड करा अशी मागणी करीत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने तीच माहिती बंद लिफाफ्यात मागितली आहे. अर्थात या ‘बंद लिफाफ्या’त येणारी माहिती आधीच बाहेर फुटली आहे', असाही आरोप ठाकरे यांनी केला आहे.