पुलवामा हल्ल्याप्रकरणी संशयितास पुण्यात अटक; पुरवली होती जवानांच्या पोस्टिंगसंदर्भातील माहिती
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

14 फेब्रुवारी रोजी भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गुरुवारी एका संशयितास पुणे जिह्यातील चाकणजवळील खालुंर्बे गावातून अटक केली गेली, बिहार दहशतवादविरोधी पथकाने (Bihar ATS) ही कारवाई केली. या हल्ल्यापूर्वी भारतीय लष्कराच्या पोस्टिंगसंदर्भातील माहिती तसेच इतर संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप या संशयितावर आहे. शरीयत अन्वर उल हक मंडल (19) असे संशयिताचे नाव असून तो प. बंगालचा रहिवासी आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून बिहार एटीएसने त्याचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. एटीएसचे पथक त्याला घेऊन बिहारला रवाना झाले आहे.

पुलवामा हल्ल्यासाठी माहिती पुरावाल्याच्या संशयावरून बांगलादेशातील झेनुडा जिह्यातील खैरूल मंडल आणि अबू सुलतान यांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांकडून लष्कराची माहिती असणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडूनच त्यांचा तिसरा साथीदार पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शरियत खालुंर्बे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करत होता. त्याच्यावर पळत ठेऊन त्याला अटक करण्यात आली.

शरियत हा हिंदुस्थानातील विविध राज्यांत जाऊन तेथील मुस्लिम तरुणांना संघटनेत सामील होण्याचे आवाहन करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.  त्याच्याकडून इसिस व इतर दोन दहशतवादी संघटनेची भित्तीपत्रके, हँडबिल, दोन बनावट मतदान ओळखपत्र, बनावट पॅनकार्ड, तीन मोबाईल व एक मायक्रोचीप जप्त करण्यात आली आहे.