Maharashtra Budget 2021-22: अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांच्याकडून महिलांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री अजित पवार । Photo Credits: DD Sahyadri

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित (Ajit Pawar) पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi) हा दुसरा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांना मोठी भेट दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली असून राज्यात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. याचबरोबर महिलांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असे म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली आहे. नवीन घरे विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार आहे. पण, घर महिलेच्या नावावर असले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Budget 2021-22: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे महत्वाचे निर्णय

महिला व बालविकास विभागासाठी 2 हजार 247 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोफत एसटी प्रवास करण्याची योजना शहरी भागातही राबवली जाणार आहे. शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेसाठी 250 कोटींचे बीज भांडवल देण्यात येणार आहे.

कोरोना संकट आणि राज्याच्या कर महसुलात झालेली घट यामुळे यंदा एक लाख कोटींहून अधिक तुटीचा अर्थसंकल्प असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकासदर आठ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.