Bhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 35; सलग तिसर्‍या दिवशीही बचावकार्य सुरूच
भिवंडीत इमारत कोसळली (Photo Credits-ANI)

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड परिसरामध्ये जिलानी ही 3 मजली इमारत सोमवार (21 सप्टेंबर) च्या पहाटे कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आता मृतांचा आकडा 35 वर पोहचला आहे. आज सलग तिसर्‍या दिवशी देखील एनडीआरएफकडून या दुर्घटनेतील बचावकार्य आणि शोधमोहिम सुरू आहे. ठाणे शहरात भिवंडी मध्ये सोमवारी पहाटे 3 वाचून 40 मिनिटांनी घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस, रूग्णवाहिका आणि एनडीआरएफ पथक दाखल झाले होते.

दरम्यान ठाण्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेची माहिती मिळताच तेथे भेट देऊन दुर्घटनेचा आढावा घेतला आहे. जखमींवर नजिकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांची ओळखा पटवून त्यांच्या कुटुंबियांकडे ते सोपवले जात आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

इमारत कोसळल्यानंतर 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर डेब्रिजमधून 5 जणांची सुखरूप सुटका झाली आहे. या इमारतीमध्ये 40 फ्लॅट्स तर 150 लोकांचे वास्तव्य होते. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीला दोनदा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र रहिवाश्यांनी इमारत रिकामी करण्यास नकार दिला होता. सध्या इमारत मालकाच्या विरोधात पोलिसा स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.