Gautam Navlakha | (File Image)

आरोपी गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. गौतम नवलखा हे भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Case) प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना एक महिन्यासाठी घरामध्येच नजरकैदेत (House Arrest) ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्यात येणाऱ्या जागेची आणि परिसराची नीट तपासणी करण्यात यावी. तसेच, त्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी येत्या 48 तासांमध्ये करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, नजरकैदेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या संरक्षणाच्या बदल्यात दोन लाख चार हजार रुपये भरण्यासही न्यायालयाने नवलखा यांना सांगितले.

भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या तळोजा कारागृहात आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.त्यामुळे त्यांना वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या घरीच नजरैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी नवलखा यांनी याचिकेद्वारे केली होती. दरम्यान, नवलखा यांच्या याचिकेला एनआयएने विरोध दर्शवला होता. नवलखा यांच्या खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावर शंका उत्पन्न करत एनआएने आरोप केला होता की, सदर रुग्णालयातील डॉक्टर हा नवलखा यांच्या परीचयाचा आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल असा आला. दरम्यान, नवलखा यांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (हेही वाचा, Bhima Koregaon Case: रोना विल्सन यांच्या लॅपटॉप मधील नरेंद्र मोदी यांच्या हत्येचं 'ते' पत्र प्लांट, अमेरिकन कंपनीचा दावा)

दरम्यान, नजरकैदेत असताना गौतम नवलखा यांना कोणत्याही प्रकारची संभाषणाची उपकरणे वापरता येणार नाही. प्रामुख्याने इंटरनेट, लॅपटॉप अथवा मोबाईल, असे काहीच त्यांना वापरता येणार नाही. पोलिसांनी उपलब्ध करुन दिलेला फोन त्यांना दिवसातून फक्त एकदा आणि तोही केवळ 10 मिनिटांसाठीच वापरता येईल. दरम्यान, गौतम नवलखा यांचे वय आणि त्यांना उद्भवलेल्या आरोग्याच्या तक्रारी पाहता त्यांना नजरकैदेत ठेवणे आम्ही योग्य मानत असल्याचे न्यायालयाने म्हटले. नवलखा यांना दातांचा त्रास आणि त्वचेची अॅलर्जी यांसारखे त्रास उद्बवले आहेत.