Bharat Bhalke (Photo Credits: FB)

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या शुक्रवारी रात्री निधन झाले. पुण्यातील रुबी रुग्णालयात (Ruby Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि किडनीचाही त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यात अखेर काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 60 वर्षांचे होते.

गुरुवारी (26 नोव्हेंबर) रात्रीपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता.आमदार भारत भालके यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील रुबी रुग्णालयात गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.हेदेखील वाचा- Bharat Bhalke Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेते होते. भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. भारत भालके यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले.

आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.