Bhandara Police: आरोपींसोबत पोलिसांची 'मटन पार्टी'; भंडारा येथील धक्कादायक घटना
Bhandara Police Mutton Party | (Photo Credit - YouTube)

भंडारा पोलीस (Bhandara Police) एका भलत्याच कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी पोलीस एका ठिकाणी गेले. मात्र, तेथे जाऊन त्यांनी आरोपीला पकडण्याऐवजी चक्क आरोपीसोबतच 'मटन पार्टी' केली. या विचित्र प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यास मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रवाना झाले होते. दरम्यान, कारवाई करण्याऐवजी पोलीस भलत्याच प्रकाराने चर्चेत आल्याने भंडारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आरोपींसोबत केलेल्या 'मटन पार्टी'चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी जे पोलीस कर्तव्यावर किंवा वर्दीत असताना आरोपींसोबत 'मटन पार्टी' करताना दिसत आहेत त्यांना निलंबीत करा. इतकेच नव्हे तर त्यांचे या आगोदरचे रकॉर्डही तपासा अशी मागणी भोंडेकर यांनी केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे तपासात पुढे आली होती. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. (हेही वाचा, Railway Accident: धावत्या ट्रेनमधून नदीत कोसळल्याने 18 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, भंडारा येथील घटना)

दरम्यान, घडल्या प्रकाराचा व्हिडिओच पुढे आल्याने पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच हे प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यास वाळू माफियांनी केलेल्या मारहाणीचे असल्याने अधिक गंभीर आहे. त्यामुळे आगोदरच कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याने पोलीस टीकेचे धनी झाले आहेत. त्यातच आता पोलिसांचा हा व्हिडिओ अल्याने पोलिसांच्या प्रतिमेवरही शिंतोडे उडाले आहेत.